
“अंधश्रद्धा ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेचा प्रश्न नसून ती विवेक, विज्ञान आणि मानवी प्रतिष्ठेला पोखरणारी सामाजिक कीड आहे. श्रद्धा माणसाला मानसिक आधार देऊ शकते, मात्र जेव्हा श्रद्धेच्या नावाखाली भीती निर्माण केली जाते, अज्ञानाचा फायदा घेतला जातो आणि चमत्कारांच्या नावाने फसवणूक केली जाते, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते.

अशा प्रवृत्तीमुळे समाजाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आणि कलंक आहे,” असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी केले. पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे वंशज प्रतिष्ठानचा भव्य शुभारंभ आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. श्रीमंत कोकाटे बोलत होते.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, पुस्तक, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय पुरस्कारार्थी: सामाजिक कार्यकर्ते अशोक थोरात, प्रा. उषा कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव खंदारे आणि युवा उद्योजक निलेश सोनवणे.
विशेष सन्मान: युवा खेळाडू कु. श्रेया जाधव, युवा विधिज्ञ ॲड. करिश्मा बुलाखे, प्रसिद्ध दांडपट्टा चालक हनुमंत थोरात, युवा उद्योजक संजय गायकवाड आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बापूराव भिसे
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बॅचचा शुभारंभ करण्यात आला.
गुणवत्ता ही कोणाचीही मक्तेदारी नाही: प्रा. श्रीमंत कोकाटे
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. कोकाटे पुढे म्हणाले, “आजच्या बदलत्या काळात महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद न करता मुलांना उच्च शिक्षण द्या, तरच कुटुंबाची आणि समाजाची प्रगती होईल. लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा फुलेंना शिक्षणकार्यात मोलाची मदत केली होती. एकीकडे ढाल, तलवार, दांडपट्टा आणि दुसरीकडे परिवर्तनाला पाठिंबा ही लहुजींची कार्यपद्धती होती. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नसून शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित घटकांमध्येच तिची मुळे रुजलेली आहेत.”
अपूर्ण माहिती आणि अफवांमुळे सामाजिक तेढ: शाहिर महादेव खंडागळे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहिर महादेव खंडागळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. “आज अपूर्ण माहिती आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे समाजात गैरसमज अन् भीतीचे वातावरण तयार होत आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याऐवजी तिची तळी उचलण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे. त्यामुळे सत्य, संयम आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कार्यकर्त्यांची नवी पिढी निर्माण होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
अंधश्रद्धेविरोधातील लढा हा माणुसकीच्या रक्षणाचा : नंदिनी जाधव
महाराष्ट्र अंनिसच्या राज्य सदस्या नंदिनी जाधव यांनी भोंदूगिरीवर जोरदार प्रहार केला. “आजारपण, कौटुंबिक अडचणी किंवा आर्थिक संकटात वैज्ञानिक कारणांचा शोध न घेता जादूटोणा, करणी, बळी, अंगारे-धुपारे अशा अवैज्ञानिक उपायांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भोंदू प्रवृत्ती अशिक्षित आणि असहाय्य लोकांचे आर्थिक शोषण करतात. त्यामुळे अंधश्रद्धेविरोधातील लढा हा केवळ विचारांचा नसून माणुसकीच्या रक्षणाचा लढा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
…तर तेव्हा २५६ मावळ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप होता का?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले, तेव्हा त्यांच्यासोबत मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंदांसारखे मोजकेच विश्वासू साथीदार होते, याची आठवण प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी करून दिली. “तेव्हा ना व्हॉट्सॲप होते, ना मोबाईल नेटवर्क. होता तो फक्त डोळ्यांचा इशारा आणि प्राणाला प्राण देणारी निष्ठा. तिथे मेसेज ‘डबल टिक’ होण्याची वाट पाहिली जात नव्हती. तंत्रज्ञान नसताना एवढी मोठी क्रांती घडली, कारण ते नेटवर्क मोबाईलचे नव्हते तर निष्ठेचे होते. त्यासाठी तेव्हा २५६ मावळ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप होता का?” असा मिश्किल पण अंतर्मुख करणारा प्रश्न त्यांनी विचारला.
राशी भविष्य हे थोतांड, कर्तृत्वच श्रेष्ठ!
राशी भविष्यावर ताशेरे ओढताना प्रा. कोकाटे म्हणाले, “कोट्यवधी किलोमीटर दूर असलेले ९ ग्रह तुमच्या नोकरीचा किंवा आयुष्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? शिवरायांनी कधीही राशी किंवा मुहूर्त बघून तलवार उचलली नाही, त्यांनी मुहूर्त बघितला तो फक्त कर्तृत्वाचा. आयुष्य पत्रिकेतल्या ग्रहांनी नाही, तर हाताच्या रेषांमधील घामाच्या थेंबांनी घडते. तुमच्या नशिबाचा रिमोट तुमच्या मनगटात आहे, कोणत्याही बाबाच्या हातात नाही. त्यामुळे थोतांडाला लाथ मारा आणि कर्तृत्वाला सलाम करा!”
संयोजन आणि उपस्थिती
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष केतन साळवे यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी तर आभार कवी गणेश भालेराव यांनी मानले.या प्रसंगी प्रा. सुहास नाईक, प्रतिष्ठानचे सचिव कुणाल साळवे, उपाध्यक्ष मयुर साळवे, खजिनदार कृष्णा साळवे, कार्याध्यक्ष सुरज साळवे, सदस्य यशोदीप सोनवणे, अजय रासगे, ऋतिक जाधव, ऋतिकेश वैराट, सिद्धेश्वर जाधव, सागर सोनकांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

