
बीडच्या संतोष देशमुख हत्येचे सावट ओसरण्यापूर्वीच दुसरी धक्कादायक घटना!; सरपंचाच्या पतीची कुऱ्हाडीने छाटून निर्घृण हत्या; ४० जण ताब्यात
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, आता मध्य प्रदेशातून अशाच एका भीषण आणि थरारक घटनेने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. बोरखेडा पंचायतीच्या महिला सरपंच ज्ञानीबाई यांचे पती रुमसिंग यांची कुऱ्हाडीने वार करून क्रूर हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयावरून तब्बल ४० जणांना ताब्यात घेतले आहे.

खांडवा-अमरावती महामार्गावर सापडला रक्तरंजित मृतदेह

शुक्रवारी सकाळी खांडवा-अमरावती राज्य महामार्गालगतच्या टांडा ते बोरखेडा रस्त्यावर रुमसिंग यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. जिथे मृतदेह सापडला तिथेच रुमसिंग यांचे शेत असून ते केळीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीचे खोल आणि खोलवर वार करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पिपलोड पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र तरणेकर यांनी हत्येचा छडा लावण्यासाठी अनेक पथके तैनात केली आहेत.

‘रात्री ९ वाजता निघाले पण घरी पोहोचलेच नाहीत!’
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रुमसिंग बोरखेडा येथे गेले होते, जिथे त्यांच्या पिठाच्या गिरणीचे आणि पायाभरणीचे काम सुरू होते. काम आटोपून रात्री ९ वाजेच्या सुमारास ते घराच्या दिशेने निघाले, परंतु ते कधी घरी पोहोचलेच नाहीत. वाटेतच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला चढवला.
आठवडाभरापासून वाद; चौकात बसून ठार मारण्याची धमकी!
रुमसिंग यांच्या हत्येमागे राजकीय आणि स्थानिक वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हत्येच्या आठवडाभरापूर्वी गावप्रमुख आणि गावातील विरोधी गटात जोरदार वाद सुरू होता. “विरोधी गटाचे लोक दुकानांमध्ये आणि चौकांमध्ये बसून निवडणुकीपूर्वी रुमसिंग यांना ‘ठार मारू’ अशी थेट धमकी देत होते,” असा गंभीर आरोप रुमसिंग यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दोन वर्षांपूर्वी मुलाचीही हत्या; पोलिसांकडून १० हजारांचे बक्षीस
या कुटुंबावर कोसळलेली ही दुसरी मोठी आपत्ती आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी रुमसिंग यांच्या मुलाचीही अशीच संशयास्पद आणि निर्घृण हत्या झाली होती. हत्येच्या १० दिवसांनंतर त्याचा मृतदेह जंगलात सडलेल्या अवस्थेत सापडला होता. आता वडिलांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षकांनी आरोपींचा सुगावा देणाऱ्यास अथवा अटकेत मदत करणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

