Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारची स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्याच हातात

फडणवीसांनी कार चालवली शिंदे नामधारी असल्याचा दिला इशारा?

ओैरंगाबाद दि ४(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी राज्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. पण, आज खुद्द फडणवीस यांनी माझ्याच हातात स्टेअरिंग असल्याचे दाखवून दिलं आहे. फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली यावेळी कार ही फडणवीस यांनी चालवली. याची मोठी चर्चा रंगली आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होणार आहे. त्याआधी या मार्गाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मार्गावर टेस्ट ड्राईव्ह घेतली. फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते.नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला. पण स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात असल्याने विरोधकांनी शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत पण कारभार फडणवीस पाहत आहेत असे म्हणत शिंदेना डिवचले आहे. आजवर फडणवीसांनी शिंदेंचा माईक ओढून, चिठ्ठी देत किंवा बास झाल बंद करा असे म्हणत अनेकवेळा अपमान केला आहे. त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आता हातात स्टेअरिंग घेत सरकारचे खरे कर्तेधर्ते आपणच आहोत असा इशाराच फडणवीसांनी दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समृद्धी महामार्ग हा फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बारामतीतील एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका गाडीतून प्रवास केला होता.त्यावेळी गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात होते. त्यावेळी भाजपाने महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते अजित पवार आहेत म्हणत आघाडीला डिवचले होते. पण आता समृद्धी महामार्गाच्या पाहणीत फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग दिसल्याने विरोधकांना आयती संधी मिळाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!