काँग्रेसच्या आमदाराचा मोठा गट भाजपात सामील होणार?
राज्याच्या राजकारणात दिवाळीआधीच पक्षांतराचे फटाके फुटणार
मुंबई दि २ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.आता सप्टेंबरमध्ये होणारा शिंदे सरकारचा विस्तार ऑक्टोबर मध्ये होणार आहे. हा विस्तार काँग्रेसमुळे लांबला आहे येत्या महिनाभरात राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याने त्यांना भाजपात येण्याचे बक्षिस म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याने आगामी विस्तार ऑक्टोबरपर्यत होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप मधील जुन्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील एक मोठा गट पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहे. मध्यंतरी काही नाराज आमदारांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पण पक्षाकडून त्याची विशेष दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला दांडी मारत नव्या सरकारला मदतच केली होती. त्यामुळे त्या नाराज गटाला भाजपा गळाला लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये कोणते २० मंत्री घेणार शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
खरी शिवसेना कुणाची तसेच पक्षाच्या निवडणूक चिन्हावर कुणाचा हक्क याचा निर्णय न्यायालयात प्रलबिंत आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद घटनापीठाकडे प्रलंबीत आहे. पण काँग्रेसचा गट भाजपात आल्यास शिंदे गटाचे काय होणार याचीही उत्सुकता होणार आहे.