Latest Marathi News
Ganesh J GIF

सुषमा अंधारे यांच्याबाबत बेताल बोलणाऱ्या आमदार शिरसाटांवर कारवाई व्हायलाच हवी

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दाखला देत खा. सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे दि ३१(प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य आहे. त्यामुळे राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्र्यानी या विषयात लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे, असे सांगत ‘संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल उपस्थित करून, त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.

राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!