‘रोहित पवारांच्या पराभवासाठी अजितदादांनी प्रयत्न केला होता’
राज्याच्या राजकारणात काका पुतण्या वादात नवा अंक, पहा नेमके प्रकरण काय?
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारणात काका पुतण्यातील राजकारण नवीन नाही. पण पवार कुटुंबीय त्याला अपवाद आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बरेच वाद झाले पण फुटीचा कलह कधी झाला नाही. पण अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यात मात्र सख्य नसून रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.”जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे काका अजित पवार यांनी अनेकांना फोन करू जीवाचे रान केले होते.” असा आरोप त्यांनी केला आहे. म्हस्के म्हणाले, “निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन करत होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून अजित पवार होते. त्यामुळे अजित पवार साहेब आगोदर आपलं बघा मग मुख्यमंत्र्यांवर टीका करा. तुम्ही रोहित पवारांना पाडण्यासाठी कोणाकोणाला फोन केले. हे जनतेला सांगा मग आमच्यावर टीका करा.” असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. दरम्यान नरेश म्हस्कें यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस मधून किंवा अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक पार पडली. या निवडणुकीत रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मते मिळवत त्यांचे विरोधक अभिषेक बोके यांचा पराभव केला. अभिषेक बोके हे शरद पवार यांच्या बहिणीचे नातू आहेत.