अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राजकीय भूकंप, राज्यात राष्ट्रवादी भाजपा युतीचे सरकार?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. तसेच सत्तासंघर्षाचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार आहे. पण यस सर्व राजकीय गदारोळात माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार केंद्रस्थानी आहेत. अजित पवार सत्तासंघर्षाच्या निकालानंतर भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना पक्षातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याने पक्षांतर बंदी कायद्याची अडचण ठरणार नाही. भाजपाकडूनही अजित पवार यांना गळ टाकला जात आहे. मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३३ जागा मिळतील. भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, त्यामुळे भाजप अजित पवार यांना सोबत घेऊन त्यांनाच मुख्यमंत्री बनवणार असल्याचीही चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवार जेव्हा ८ एप्रिलला काही तास संपर्कात नव्हते. नेमके त्याच दिवशी भाजप नेते अमित शहा यांना भेटून अंतिम चर्चेसाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी सत्ता स्थापनेचा फाॅर्मुला तयार करण्यात आला होता. पण या सर्व चर्चा होत असताना शरद पवार मात्र भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीतील भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक असणार गट पवारांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे. कारण २०१९ साली अजित पवार यांनी केलेले बंड शरद पवार यांनी ८० तासात मोडीत काढले होते. यावेळी तो धोका टाळण्यासाठी शरद पवार यांची मनधरणी केली जात आहे.
दुसरीकडे भाजप आणि अजित पवार एकत्र येणार असल्यामुळे एकनाथ शिंदे गट अस्वस्थ आहे. निकाल विरोधात येण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपावर दबाव टाळण्यासाठी शिंदे गटाने अजित पवार यांना शिवसेनेने येण्याची आॅफर दिली आहे. पण अजित पवार यांनी मात्र ‘माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय, मला तेच कळत नाही असा सवाल उपस्थित करत सस्पेंन्स वाढवला आहे.