पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, लाखोची रोकड लंपास, एकावर हल्ला
अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील साकूर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवत दिवसभराची रोकड लंपास केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले ३ अज्ञात दरोडेखोर मोटर सायकल मध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले. कर्मचारी विलास कातोरे हे पेट्रोल देण्यासाठी बाहेर गेले असता पेट्रोल भरल्यानंतर हे तरुण पैसे न देता थेट पंपाच्या कॅबीनमध्ये घुसले. यावेळी तिघांपैकी एकाने थेट बंदूक काढून सुनील गिरे यांच्यावर रोखत पैसे काढून देण्याचा इशारा केला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसऱ्याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. यावेळी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दिवसभरातील पेट्रोल डिझेल व ऑइलचे जमा झालेले २ लाख ५० हजार ७४७ रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याप्रकरणी सुनील गिरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल पंपांवर दरोडा पडण्यापूर्वी याच दरोडेखोरांनी घारगाव बसस्थानकाजवळ असणाऱ्या लक्ष्मी टायर वर्क्स या दुकानाचे मालक अनुदेव अनंत ओटुशेरी यांच्या दुकानात घुसून त्यांच्या खिशातील सर्व रोकड, दोन मोबाईल व त्यांची मोटारसायकल चोरून नेली होती त्याचबरोबर त्याच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले होते.