Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार होणार

राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, भाजपाला धक्का, संसदेत गांधी परतणार

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव प्रकरणा’त मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणी दोषी आढळल्याने सुरत न्यायालयाने त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर काँग्रेससह इंडियाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

सूरत कोर्टानं राहुल गांधी यांना २३ मार्चला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांच्यावतीनं कोर्टात अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, पूर्णेश मोदी यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आपला निर्णय देताना न्यायालय म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या सार्वजनिक जीवनात राहण्याच्या अधिकारावरच परिणाम झाला नाही, तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांच्या अधिकारावरही परिणाम झाला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याचे कोणतेही कारण कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेले नाही, अंतिम निकाल येईपर्यंत शिक्षेच्या आदेशाला स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण कोणत्याही एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण संसदीय मतदारसंघाचे आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वापासून वंचित कसे ठेवता येईल? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा थांबवली नसती तर राहुल गांधी संसदेतून अपात्र ठरले असते आणि त्यांना पुढची ८ वर्षे निवडणूक लढवता आली नसती. पण आता राहुल गांधी पुन्हा आणि संसदेत येऊ शकतात. पण अधिवेशनाला आठवडा शिल्लक असल्याने लोकसभा अध्यक्ष याच सत्रात खासदारकी बहाल करणार की पुढच्या दत्ताची वाट पहावी लागणार हे पाहणे महत्वाचे आहे, कारण संसदेत ८ आॅगस्टला अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. त्यात राहुल गांधी सहभागी झाल्यास इंडिया आघाडीला बळ तर भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. न्यायालयात राहुल गांधी यांना दोन वर्षाहून कमी कालावधीची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केलेल्या एका सभेतील वक्तव्यावरुन पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी यांची सदस्यता रद्द झाल्यानंतर वायनाड येथे पोटनिवडणूक झाली असती तर त्यांना सदस्यत्व परत मिळाले नसते. परंतु तेथे अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!