‘राष्ट्रवादीच्या स्वागताला भाजपाचा झेंडा व दुपट्टा तयार’
राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपात प्रवेश करणार? अजितदादांवर कोणत्या नेत्याची सावली?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यसतच अजित पवार मोठा गट घेऊन भाजपात जाणार अशाही चर्चा होत आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय उधान आले आहे.
अजित पवार हे आपला गट घेऊन भाजपमध्ये येणार आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यता आला होता. त्यावर आता त्यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता आमच्या संपर्कात नाही. पण जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर आमचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार नेता अजित पवार की आणखी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही कुणाच्या संपर्कामध्ये नाही आहोत. आम्ही कुणाला या असे देखील म्हणालो नाही. पण जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही. असे बावनकुळे म्हणाले आहेत. पण भाजपाने आधीही एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमचा त्यांच्या बंडाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता.पण नंतर मात्र शिवसेनेतील बंड हे भाजपानेच घडवून आणल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे आताही राष्ट्रवादीच्या आम्ही संपर्कात नाही हे विधान किती खरे आहे याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणून त्यांना सावली भेटत आहे असा आरोप शालिनी पाटील यांनी केला होता. त्यामुळे राजकीय भूकंप होणार का? याचे चित्र आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे.
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या १५ मे नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे १५ मेच्या अगोदर राष्ट्रवादीचा गट भाजपात सामील होईल असे सांगितले जात आहे. पण राष्ट्रवादीचा गट भाजपात आल्यास शिंदे गटाची मात्र वाट बिकट होणार आहे.