Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सत्ताधारी युतीत तणाव, भाजप आक्रमक, एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढणार?

कल्याण दि १६(प्रतिनिधी)- सत्तेत एकत्र असूनही ठाणे जिल्ह्यात मात्र सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात अजूनही मनोमिलन झालेले नाही. उलट दोन गटात नेहमीच वादाच्या घटना घडत आहेत. वरिष्ठांनी लक्ष घालूनही दोघांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. आत्ताही कल्याण पूर्व भागात शिंदे गट आणि भाजपात जोरदार हाणामरीची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युतीत तणाव निर्माण झाला आहे.

चक्कीनाका टेकडी भागात भिंतीवरील कमळ चिन्ह रंगविण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची त्याचेच पर्यावसन हाणामारीत झाले. शिंदे समर्थकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात मात्र प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका टेकडी भागात भाजपा कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर पक्षाचे कमळ चिन्ह रंगविण्याची कामे सुरू आहेत. यावेळी तिसगाव-चक्कीनाका भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या समर्थकांनी तुम्ही हे चिन्ह का काढत आहात, असा प्रश्न विचारत बेदम मारहाण केली. त्यानंतर भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले असून शिवसेनेने आपल्या नगरसेवक, कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा आम्ही हात सैल सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपाचे कल्याण पूर्व शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला आहे. तसेच संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, असेही सांगितले आहे. या प्रकारानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यासमोर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कल्याण लोकसभा मतदार संघात देखील भाजप आणि शिंदे गटातील वाद अनेक घटनांमधून समोर आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाकडून अडवणूक होत असल्याने भाजप नेते, पदाधिकारी नाराज आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!