
पुणे: गुलटेकडी येथील डायस प्लॉट परिसरात घर बांधण्याच्या वादातून सख्ख्या बहीण-भावाच्या कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात केवळ मारहाणच झाली नाही, तर आरोपींनी “तुझा बाप भेटला असता तर त्याचं मुंडकं तोडून नेलं असतं” अशी भीषण धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पिंटुसिंग दुधाणे, आसमानसिंग टाक आणि खलीसिंग दुधाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?
शक्तीसिंग दुधाणे हे आपल्या जागेत घर बांधत असताना त्यांची बहीण धनकौर दुधाणे हिने या बांधकामाला विरोध केला. या वादाचे पर्यावसान १० मे रोजी हिंसक वळणात झाले. शक्तीसिंग यांचा १७ वर्षीय मुलगा अरमानसिंग ताप आल्याने घरात झोपलेला असताना, आरोपींनी घरात घुसून त्याच्यावर कशाच्या तरी सहाय्याने वार केला. हा वार त्याच्या डोळ्याच्या वर लागल्याने तो जखमी झाला.

धक्कादायक धमकी:
हल्ल्यादरम्यान आरोपी पिंटुसिंग याने अरमानसिंगला धमकावत म्हटले की, त्याने नुकताच कोथरुडमध्ये एकाचा हात कापला असून, आता तो शक्तीसिंगचे मुंडके कापण्यासही मागेपुढे पाहणार नाही. “जिथे भेटेल तिथे गोळ्या घालीन” अशा शब्दात धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले.

पोलीस तपास:
अरमानसिंग दुधाणे याने दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या खुनी हल्ल्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

