
पुणे: कात्रज जवळील आंबेगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी दुपारी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. घरातील क्षुल्लक वादाचे रूपांतर एका क्रूर हत्याकांडात झाले असून, ६० वर्षीय सुनेने आपल्या ८० वर्षीय सासूची धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

बेडरूममध्ये दुसऱ्या सुनेला कोंडले अन्…
ही धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रुक येथील ‘समृद्धी रेसिडेन्सी’ मध्ये घडली. मृत महिलेचे नाव सुमन शिंदे (वय ८०) असून, आरोपी सून अनुपमा संजय शिंदे (वय ६०) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास सासू-सुनेमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी अनुपमा यांनी क्रूरतेचा कळस गाठला. घरात असलेल्या दुसऱ्या सुनेचा अडथळा येऊ नये म्हणून अनुपमा यांनी तिला बेडरूममध्ये ढकलले आणि बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूने सासू सुमन यांच्यावर हल्ला चढवला.

हल्ल्याचा भीषण प्रकार
रागाच्या भरात असलेल्या सुनेने वृद्ध सासूच्या हातावर आणि गळ्यावर सपासप वार केले. अत्यंत गंभीर जखमी झालेल्या सुमन शिंदे यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. घरातील ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीला धावले, मात्र तोपर्यंत सर्व संपले होते.

