बडोदा एक्सप्रेस वे साठी आदिवासांना जबरदस्तीने बेघर करण्याचे कारस्थान?
आदिवासी बांधवांच्या जमिनीचा मोबदला व पुनर्वसन करुनच भुसंपादन करण्याची मागणी
मुंबई दि २१ (प्रतिनिधी) -भाजपा सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा वरवंटा आता आदिवसी बांधवांवर फिरवला जात आहे. मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे च्या भूसंपादनासाठी आदिवासी बांधवांना घरातून जबदरस्तीने हुसकावून लावले आहे. शासन, प्रशासन व पोलीसांच्या मदतीने आदिवासांना बेघर केले आहे. आधी या आदिवासी बांधवांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला द्या, त्यांचे पुनर्वसन करा त्यानंतर भूसंपादन करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणालाही न जुमानता मनमानीपद्धतीने कारभार करत असल्याचा प्रत्येय अनेक घटनांमध्ये आलेला आहे. भाजपा सरकारची वक्रदृष्टी आता आदिवासी बांधवांवर पडली आहे. मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे प्रकल्पातील बाधित आदिवासांची, जमिनीसह घरांचे पैसे मिळावेत, राहण्याची व्यवस्था करावी व जबदरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. जोपर्यंत या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नाही त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत काम थांबवा. आदिवासी बांधवांना धमकावून त्यांना बेघर करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सरकारच्या निष्काळजीपणाने १४ लोकांचे बळी घेतले आहेत. त्यानंतर मृतांच्या वारसांना तोंडदेखले ५ लाख रुपये देऊन त्यांची बोळवण केली पण या सरकारी अनास्थेने घेतलेल्या बळींसाठी जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये आणि आता विकासाच्या नावाखाली आदिवासांना बेघर केले जात आहे. भाजपाच्या या असंवेदनशिल सरकारने आदिवासी बांधवांना न्याय द्यावा असेही लोंढे म्हणाले.