
‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा अजित पवारांना जोरदार टोला, मुख्यमंत्री पदावर देखील भाष्य
पुणे दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुमताचा आकडा नसतानाही पवारांनी ही वक्तव्य केल्याने त्यांची भाजपाशी असणारी जवळीक देखील बोलून दाखवण्यात येत आहे. त्यात आता आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे. पुणे दाै-यावर असणाऱ्या अमृता फडणवीस यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? या प्रश्नावर भाष्य केले आहे.
अमृता फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ‘मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी २४ तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल’ असे राजकीय उत्तर दिले आहे. मध्यंतरी अजित पवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.आता त्याला ब्रेक लागला आहे. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ” अजित पवार भाजपाबरोबर येणार की नाही ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असणार आहे. राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कोण कोण कुठे कुठे डोळे मारत आहे,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर मला वाटतं की, महाराष्ट्र आपला असं राज्य आहे की, जे खूप काही करू शकतो आणि खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्या जनतेसाठी जो पक्ष पुढे येतो. त्या पक्षाला न्याय देऊ शकेल असं वाटलं, तर ते चांगलं आहे, तो कोणीही असला तरी चालेल’ अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांनी डोळा मारला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी सारवासारव केली होती. पण अमृता फडणवीसांनी नेमका तोच मुद्दा हेरत राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात, असं विधान केले आहे.