
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून वाद तीव्र; सुनेत्रा पवार अन् प्रफुल्ल पटेलांना सच्चिदानंद सिंह यांची रिमायंडर नोटीस!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. १७ ऑगस्ट रोजी ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी ९ जुलै २०२६ रोजी सच्चिदानंद सिंह यांनी पहिली नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर गंभीर आक्षेप नोंदवले होते. आता पाठवलेल्या रिमायंडर नोटीसमुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय आहे नोटीसमधील मुख्य दावा?

घटनाबाह्य प्रक्रिया: २६ फेब्रुवारी रोजी झालेली अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसून ती घटनाबाह्य आहे, असा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे
निवडणूक प्राधिकरणाचा अभाव: या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी कोणतेही अधिकृत निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्यात आले नव्हते.
प्रतिनिधींना संधी नाही: सच्चिदानंद सिंह यांच्यासह इतर राष्ट्रीय प्रतिनिधींना या निवडणुकीत नामांकन अर्ज भरणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी दिली गेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली होती. त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, आता या निवडीच्या कायदेशीर प्रक्रियेवरच माजी राष्ट्रीय सचिवांनी प्रश्न उपस्थित केल्याने कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

