भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाचा जीवघेणा हल्ला
भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे, हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- दहिसरमध्ये बॅनरवरुन झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने हल्ला झाल्यामुळे वारे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विभीषण वारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात विभीषण वारे यांच्या पाठीला, खांद्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत विभीषण वारे हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. मात्र, त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय विभीषण वारे यांनी व्यक्त केला. विभीषण वारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला सूडभावनेतेून झाला असल्याचे वारे यांनी सांगितले.

विभीषण वारे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत राजकीय सूडापोटीच वारे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. दहिसरमधील या घटनेमुळे पुढील काही दिवसात भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.