‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’
भाजप आमदारांनी अजब विधान, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, बघा नेमके काय म्हणाले
सोलापूर दि ३(प्रतिनिधी)- सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांनी अजब वक्तव्य केलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत. सुभाष देशमुखांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, “यंदा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यात त्यांनी महिलांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं. त्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं. मुलगी शिकायला गेल्यावर त्यासाठी ४,००० रुपये देण्याचं ठरवलं. मुलगी पाचवी-सहावीला गेल्यावर ६००० रुपये द्यायचं ठरवलं, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर पुन्हा १५-१८ हजार रुपये देण्याचं जाहीर केलं. मला वाटतं आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहिती नाही, पण यावेळी देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत,” असे सुभाष देशमुख यांनी म्हटल्याने याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा यावर्षी पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
सुभाष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या बचत गटांच्या उत्पादनांना चांगले दिवस येतील. असा विश्वास व्यक्त केला.