आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका!
भाजपाचा विरोधकांना गंभीर इशारा, मराठा समाजाबरोबरच ओबीसींना दिले हे आश्वासन
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका व अकलेचे तारे तोडू नका’ असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
नागपूरात माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, एका घटकाचे आरक्षण दुसऱ्या घटकाला देणे योग्य नाही. ओबीसीचे आरक्षण कायम राखून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षण दिल्यावर कोर्टात चकरा माराव्या लागणार नाही. फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी भूमिका सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी आर्थिक-सामजिक सर्वेक्षणाच्या आधारावर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या आरक्षणावरून कोणताही किंतु-परंतु करण्याची गरज नाही. त्यांनी यात्रेचा उद्देश व भूमिका आधीच जाहीर केली आहे. राज्यात तीन नेते असून तिन्ही नेत्यांत योग्य समन्वय आहे. त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम असू शकतात. त्यावरून चर्चा करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईत भाजपा लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना श्री बावनकुळे म्हणाले, भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व योजनांपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पक्ष म्हणून केले आहे. कोणतेही रिपोर्ट कार्ड कुणाकडूनच मागविले नाही, त्याविषयी केवळ वावड्या उठविण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.