‘देवाची कृपा म्हणू नका आता दोन अपत्यावरच थांबा’
नागरिकांना आवाहन करताना अजितदादांची तुफान फटकेबाजी, मिडीयालाही टोला
बारामती दि २३(प्रतिनिधी)- नुकतेच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब नियोजनाचा मंत्र दिला आहे. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली.
अजित पवार बारामतीत विकासकामांची पाहणी करायला आले होते, यावेळी एका कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, “देवाची कृपा, देवाची कृपा अस म्हणू नका एक किंवा २ अपत्यांवर थांबा, इथून पुढे ज्यांना २ पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना कसलीच सवलत द्यायची नाही, असं माझ्या मनात आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही घाबरत घाबरत २ अपत्य असतील तर थांबवा असा निर्णय घेतला. त्यातून पण आम्ही मार्ग काढला. जर पहिली डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या डिलिव्हरी दरम्यान जुळी मुले झाली तरी ती तीनच होतात ना. पण, जर पहिल्याला जुळी झाली तर दुसरी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला. ज्यांना राजकारणात यायचं आहे ते बरोबर काटेकोर नियोजन करतात. असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला आहे. यापुर्वी देखील अजित पवार यांनी लोकसंख्येवर मार्गदर्शन करताना “आपल्या सुनेला किंवा मुलीला दोन मुलांवरच थांबायला सांगा. दोन मुली झाल्या तरी तिसरं अपत्य होऊ दे असं नको. वंशाचा दिवा पाहिजे असा हट्ट धरू नका. मुलगीही कर्तबगार असते” असे अजित पवार म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचे उदाहरण देताना “आता शरद पवार एकाच मुलीवर म्हणजे सुप्रियावर थांबले की नाही? सुप्रिया ही साहेबांचं नाव पुढे घेऊन चालली आहे. वंशाचा दिवाच पाहिजे असा काही हट्ट धरू नका” असे आवाहन केले होते. दरम्यान युनोच्या अहवालानुसार २०२४ साली भारताची लोकसंख्या १५० कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अजित पवार यावेळी मिडीयावर चांगलेच भडकलेले पहायला मिळाले तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असं मला विचारलं होतं. तेव्हा मी म्हणले २०२४ कशाला, जर आम्हाला बहुमत मिळालं तर आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तुला काय त्रास आहे का माझा? हा असं म्हणाला तुमचं मत काय? पुन्हा त्यांना म्हणायचं अजित पवार असं म्हणाला, आता तुमचं मत काय? एवढेच धंदे आहेत का तुम्हाला? अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.