दारुड्या तरुणांनी तरुणीच्या स्कुटीला धडक देत चार किलोमीटर फरफटत नेले
रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
दिल्ली दि २(प्रतिनिधी) राजधानी दिल्लीत महिला असुरक्षित असल्याचे वारंवार दिसून आले आहे. २०२२ मध्ये दिल्लीत महिला अत्याचारात वाढ झाली होती तर आता २०२३ च्या पहिल्याच दिवशी दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील सुलतानपुरीत मद्यधुंद तरुणांनी स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणीला धडक दिली आणि तिला चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले त्यामुळे या अपघातात त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरला पहाटे तीन वसजता एका बलेनो कारमधून पाच तरुण चालले होते. ते मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी त्यांच्या गाडीने एका स्कुटीला धडक दिली. त्यामुळे स्कुटीवरील तरूणीचा पाय कारच्या एका चाकात अडकला. पण त्या तरूणांनी गाडी न थांबवता त्या तरुणीला तब्ब्ल चार किलोमीटर फरफटत नेण्यात आले. फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीचा मृत्यू झाला. जेव्हा तरुणी मृतावस्थेत आढळली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपी तरुणांना अटक केली आहे. दीपक खन्ना, अमित खन्ना , कृष्णा, मिथुन, आणि मनोज मित्तल अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. दिल्लीच्या प्रचंड थंडीत भररात्री रस्त्यावर हे कृत्य विशेष म्हणजे रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे त्या तरुणीला मदत मिळू शकली नाही. या मृत तरुणीचे कुटुंबीय अमन विहार येथे राहतात. तिच्या घरी आई, चार बहिणी आणि दोन भाऊ आहेत. तिच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. बहीण विवाहित आहे. भाऊ लहान आहेत. तिचे कुटुंबीय या घटनेने हादरून गेले आहेत. दरम्यान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
दिल्लीत वारंवार महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. केवळ अत्याचाराच्याच नव्हे तर क्रूर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. २०२२ साली दिल्लीत महिला अत्याचाराच्या तीन हजार घटना घडल्या होत्या. या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पण नवीन वर्षाच्या सुरूवातीला या घटनेने देशात सर्वांनाच धक्का बसला आहे.