बीड दि १४(प्रतिनिधी)- दारू पिऊन आलेल्या नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना बीडच्या गोवर्धन हिवरा गावामध्ये उघडकीस आली आहे. अजून परळीतील घटनेची चर्चा सुरु असताना परत पत्नीने पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे असे मृत पतीचे नाव आहे. तर वैष्णवी काकडे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बुरान नसीर शेख यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी रात्री हनुमान दारू पिऊन घरी आला. यानंतर पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोराचे भांडण झाले. त्यामुळे वैतागलेल्या वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून पतीची गळा आवळून हत्या केली. पण पतीने गळफास घेतल्याचा कांगावा केला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी हनुमान पलंगावर उताण्या स्थितीत पडल्याची दिसून आले.पोलीसांनी नातेवाईकांच्या मदतीने परळीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी हनुमानला तपासून मयत घोषित केले.
परळीच्या रुग्णालयात हनुमानच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यातून गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिरसाळा पोलिसांनी पत्नी वैष्णवी हिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून तिला ताब्यात घेतले आहे. बीड जिल्ह्यात लागोपाठ दोन ठिकाणी पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.