
‘वडापावची जागा इडलीने घेणे हा मोठा सकारात्मक बदल’; शाळांच्या कँटीन मेन्यूवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सुरू केलेल्या कडक कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते आणि हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक कँटीन आणि हॉटेल्सचे परवाने रद्द अथवा निलंबित झाल्यानंतर आता याचा मोठा आणि सकारात्मक परिणाम शाळांच्या आवारात पाहायला मिळत आहे. ‘एक चूक आणि थेट परवाना रद्द’ या भीतीने शाळा परिसरातील दुकानदारांसह शाळा प्रशासनानेही सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

वडापाव-समोसे गायब; मेन्यूत हेल्दी पर्यायांची एन्ट्री

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, मुंबईतील अनेक शाळांनी आपल्या कँटीनचा मेन्यू पूर्णपणे बदलला आहे. विशेषत: ‘आर्चडिओसेसन बोर्ड ऑफ एज्युकेशन’ (ABE) द्वारे संचलित शाळांच्या कँटीनमधून मुलांचे आवडते पण आरोग्यास हानिकारक असलेले वडापाव, समोसे आणि तेलकट पदार्थ हद्दपार करण्यात आले आहेत. त्यांच्या जागी आता इडली, डोसा, पोहा, शिरा आणि उपमा यांसारखे पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत.

याशिवाय, सर्व प्रकारच्या शीतपेयांवर (Cold Drinks) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर, मुलांनी घरातून आणल्या जाणाऱ्या डब्यात (टिफिनमध्ये) कोणता आहार असावा, याबद्दलही शाळा प्रशासनाकडून पालकांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या जात आहेत.
तुकाराम मुंढे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
शाळांमधील या बदलाचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनापासून स्वागत केले आहे. सोशल मीडियावर यावर आपले मत मांडताना ते म्हणाले. “आरोग्यदायी पर्यायांची निवड करणे ही सर्वात सोपी गोष्ट असायला हवी. जेव्हा शाळेच्या कँटीनमध्ये वडापावची जागा इडली घेते आणि कोलाऐवजी ताक दिले जाते, तेव्हा हा बदल वरवर पाहता खूप छोटा वाटू शकतो; परंतु मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या वातावरणात घडतात, त्या संपूर्ण अन्न-संस्कृतीमध्ये झालेला हा एक मोठा आणि सकारात्मक बदल आहे “.
तुकाराम मुंढे यांच्या या विधानातून मुलांच्या भविष्यातील आरोग्यासाठी आणि चांगल्या सवयींसाठी शाळांमधील हा पायाभूत बदल किती महत्त्वाचा आहे, हेच अधोरेखित होते.

