सात जणांच्या टोळीचा एटीएम सेंटरमध्ये तरुणीला गंडा
गंडा घालण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, हातचलाखीने मारला डल्ला
पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात तरुणीला एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सात जणांच्या टोळक्याने १९ हजार रुपये लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. मदत करण्याच्या बहाण्याने टोळीने हातचलाखी करुन एटीएम कार्डाची अदलाबदल करुन तिच्या वडिलांच्या बँक खात्यातून पैसे काढले. ही घटना एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुण्यातील बोधले नगर भागात मनाली प्रमोद दोंदे ही तरूणी पैश्यांची आवश्यकता असल्याने बोधले नगरमधील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेली होती. त्याचवेळी एटीएम सेंटरच्या आजूबाजूला सात संशयितांनी “सेंटरमध्ये गर्दी करुन लवकर पैसे काढा, आम्हाला वेळ होत आहे, असे बोलून तरुणी मशिनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया करत असताना चोरुन तिचा एटीएम पीन पाहून घेतला. त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून घेतले. त्यानंतर वडिलांना पैसे काढल्याचा मेसेज आल्याने हा प्रकार समोर आला.
मनीलाच्या वडिलांच्या बँक खात्यातून एकदा १० हजार व दुसऱ्यांदा ९ हजार असे १९ हजार रुपये परस्पर काढून पळ काढला. दरम्यान, बँक खात्यातून एवढे पैसे वजा झाल्याचे मनालीच्या वडिलांना कळाले. त्यांनी तिच्याकडे विचारणा करताच, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे.