
“१० लाख द्या, नाहीतर वर्तमानपत्रात बातमी छापून क्लिनिक बंद पाडू!”; पुण्यात दोन कथित पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा
पुण्यात तोतयागिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता एका नामांकित डॉक्टरांना १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलींचा गर्भपात करत असल्याची बातमी छापण्याची आणि क्लिनिक बंद पाडण्याची धमकी देणाऱ्या दोन कथित पत्रकारांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमाननगर परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रणव ऊर्फ प्रसाद बोरसे (वय २५) आणि शुभम सौदागर (वय २६) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.

हॉटेलमध्ये गाठून धमकावले!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ४ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० ते मध्यरात्री १२:०० च्या सुमारास टिंगरेनगर येथील एका हॉटेलमध्ये घडला.
आरोपींनी स्वतः पत्रकार असल्याचे सांगून डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला गाठले. “तुमच्या क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलींचे बेकायदेशीर गर्भपात केले जातात, अशी माहिती आमच्याकडे आहे,” असा दावा करत आरोपींनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.

‘१० लाख द्या, नाहीतर सकाळीच अटक!’
आरोपींनी डॉक्टरांना गंभीर परिणामांची भीती दाखवत म्हटले वर्तमानपत्रात तुमच्याविरोधात बातमी प्रसिद्ध करून तुमचे क्लिनिक कायमचे बंद पाडू.तुम्हाला या प्रकरणात ५ वर्षांची जेल होईल आणि जामीन मिळायला ३ ते ४ वर्षे लागतील, तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू.या सर्व प्रकरणातून वाचायचे असेल, तर आताच्या आता १० लाख रुपये द्या; अन्यथा उद्या सकाळीच तुम्हाला अटक होईल.
विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
या भयंकर धमक्यांना न घाबरता डॉक्टरांनी थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. डॉक्टरांच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी दोन्ही कथित पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

