
राज्यपाल कोश्यारींचा जाताजाता शिंदे गटाला धक्का
कोश्यारींना राजभवनातून निरोप, नवे राज्यपाल बैस शनिवारी घेणार शपथ
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर नवीन राज्यापाल शनिवारी राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.
मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विरोधकांनी टीका करताना राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमानाची मुर्ती त्यांना भेट दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान राज्यपाला कोश्यारी यांनी जाताजाता शिंदे गटाला जोराचा धक्का दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची दहावी जागा रिक्त होती. या जागेवर शिंदे गटाने दावा केला होता पण कोश्यारी यांनी याजागी भाजपाचे धनेश सावंत यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे कोश्यारींनी अखेरच्या क्षणी शिंदे गटाचा गेम केला, अशी चर्चा रंगली आहे. सावंत हे शेलार यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.
राज्यपाल कोश्यारी यांना आज नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. आता ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज आपल्या गावी परतणार आहेत. तर शनिवारी १८ तारखेला नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे.