‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं होतं’
ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटीलचा धक्कादायक खुलासा, सहभागी असणाऱ्यांची नावे सांगण्याचा दावा
पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात खळबळ उडवून दिलेल्या ड्रग्ज रॅकरटचा मास्टरमाईंड ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात जात असताना ललितने धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज रॅकेट आणि ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. पण ललितच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना ललित पाटील यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. ललितला रूग्णालयात घेऊन जात असताना मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटील म्हणाला आहे. त्यामुळे ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता? याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ललित पाटील आणि भूषण पाटील या दोघांनी मिळून ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यांच्या या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापीमारी केली. तेव्हा ललित गेल्या नऊ महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. यादरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला होता. दुसरीकडे ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे.आमच्या मुलावर कारवाई करा, पण त्याचा एन्काऊंटर करु नका, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान याआधीही ललितला अटक करण्यात आली होती. तेंव्हा तीन वर्षांपैकी १६ महिने ललित पाटील उपचारांचे कारण देऊन ससून रुग्णालयातच होता. या ठिकाणी पोलिसांचा पहारा असूनही ललित पाटील ड्रग्जचा व्यवहार करत होता.
ललित पाटीलचे बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तो मुळचा नाशिकचा आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. मात्र दुसऱ्य़ा पत्नीचे अपघाती निधन झाले. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या ड्रग्ज प्रकरणात त्याचा भाऊ भूषण पाटील देखील सहभागी होता. ललितने याआधी वेगवेगळे व्यवसाय देखील केले आहेत. तसेच त्याने वाईन कंपनीत देखील काम केले आहे.