Latest Marathi News
Ganesh J GIF

“दोन-चार जणांना रिटायर्ड करून मगच मी निवृत्त होणार!”; पंकजा मुंडेंच्या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे. “दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं, आधी नाही,” असे खळबळजनक विधान पंकजा मुंडे यांनी केज येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात केले आहे. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर नेमके कोण-कोणते नेते आहेत, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

“मी चांगली खमकी आहे; निवृत्तीचा प्रश्नच नाही”

आपल्या राजकीय निवृत्तीच्या रंगणाऱ्या चर्चांचा पंकजा मुंडे यांनी जोरदार समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मी कुठेही जात नाही, इथेच आहे. कुणीतरी बातमी दिली की ताई रिटायर्ड होणार. काही रिटायर्ड वगैरे होत नसते. मी चांगली खमकी आहे. मला कुठे काय झालंय? रिटायर्ड काय व्हायचं आहे? आपले वय सध्या ४७ वर्षे असून अजूनही पक्षात आणि समाजात काम करण्याची मोठी क्षमता आपल्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगत त्यांनी निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम दिला.

पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर नक्की कोण?

‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतरच निवृत्त होणार’ या त्यांच्या विधानामुळे राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी हा टोला पक्षांतर्गत विरोधकांना लगावला आहे की महाविकास आघाडीतील राजकीय विरोधकांना, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या या अप्रत्यक्ष इशाऱ्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता यावर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!