इंदुरीकर महाराजांसमोरच चिमुकल्याचा झुमकावालीवर ठेका
चिमुकल्याचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, महाराजांनी मारला कपाळावर हात
जळगाव दि २८(प्रतिनिधी)- सध्या झुमकावाली पोर हे खान्देशी गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गाण्यांची क्रेझ आहे. पण जळगावात मात्र तरुणाईला चित्रपट गाण्यांपासुन लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांसमोरच एका लहान मुलाने त्या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इंदुरीकर महाराज कीर्तन करत असताना त्यांच्यासमोर पहिल्या रांगेत एक चिमुकला बसला होता, तो झुमकावाली पोर गाण्यावर ताल धरत होता हे महाराजांनी पाहिले आणि त्याला स्टेजवर बोलावले. त्यानंतर त्याला स्टेजवर गाणं म्हणून नाचायला सांगितलं. विशेष म्हणजे त्या चिमुकल्याने इंदुरीकर महाराजांना माईक खाली करायला सांगत झुमकावाली गाणे म्हणत डान्स केला. पोराचे हे डेअरिंग पाहुन इंदुरीकर महाराजांनी कपाळालाच हात लावला तर प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला होता. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणे खुपच प्रसिद्ध आहे. या गाण्याचे अनेक रिल बनवण्यात आले आहेत. तेच गाणे एका चिमुकल्याच्या तोंडून एैकत महाराजांनी देखील आनंद घेतला. सोशल मिडीयावर यावर मजेशीर कमेंट केल्या जात आहेत.