Latest Marathi News
Ganesh J GIF

केसरकरांच्या ‘निकटवर्तीया’वर टांगती तलवार; खरात प्रकरणात कोट्यवधींच्या देवाणघेवाणीचा संशय

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष पोलीथ पथकाकडून चौकशी सुरू आहे. जमीन गैरव्यवहार, फ्लॅटची खरेदी, भक्तांकडून उकळलेले पैसे अशा अँगलने पोलीस तपास करीत आहे. खरात याच्याबरोबर अनेकांचे संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस एकेकाला चौकशीकरिता बोलवत आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दिपक लोंढे याला आज शिर्डी पोलिसांनी चौकशीकरिता बोलावले आहे.

खरातसोबतच्या आर्थिक व्यवहार प्रकरणात दीपक लोंढे याचे नाव समोर आले असून, आज त्याला चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. गेल्या काही तासांपासून त्याची पोलीस चौकशी सुरू असून, या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दीपक लोंढे याच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशोक खरात याच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात दीपक लोंढे याच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात नॉमिनी असलेल्या समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे तब्बल चार खाती आढळून आली आहेत. तसेच शिर्डीतील एका मोठ्या जमीन विक्री व्यवहारातही लोंढे याचे नाव गुंतले असून, त्यातील पैशांची देवाणघेवाण राष्ट्रीयकृत बँकांमार्फत झाल्याचा संशय आहे.

अशोक खरातसोबत त्यांचे नेमके काय संबंध आहेत? कोट्यवधींचे हे व्यवहार कोणत्या कारणासाठी करण्यात आले? जमीन विक्री व्यवहारातील तुझी नेमकी भूमिका काय? असे प्रश्न पोलिसांनी दीपक लोंढे याला विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दीपक लोंढे पोलीस चौकशीत नेमका काय जबाब नोंदवतो आणि त्याच्या खात्यातून झालेल्या व्यवहारांबद्दल काय उत्तर देतो?, यावर पोलिसांची पुढची कारवाई अवलंबून असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!