भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू
राहुल गांधींवरील कारवाईविरोधातील काँग्रेसच्या मौन सत्याग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. एक दिवसाचे मौन सत्याग्रह संपले आता भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू, असा असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन सत्याग्रह करण्यात आले. आंदोलनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरम करुन सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात केला आहे. भाजपाच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात हा लढा सुरु आहे. हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करुन भाजपाचा भांडाफोड करु. राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असताना अदानी-मोदी संबंध काय आहेत असा सवाल विचारल्यानंतर मोदी सरकार घाबरले व आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली आहे. देशातील जनता हे सर्व पहात असून राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपाविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मौन सत्याग्रह आंदोलन हे राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आहे, राहुल गांधींवर ज्या पद्धतीने कारवाई केली त्या अन्यायी कारवाई विरोधात मौन सत्याग्रह आंदोलन आहे. राहुल गांधी असे काय बोलले होते की त्यांची खासदारही रद्द केली. काँग्रेसला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे पण निरपेक्ष यंत्रणेवरही दबाव आहे की काय असे चित्र दिसत आहे. तर देशाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या खेळाडू मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण शरणसिंह मोकाट फिरत आहे. एफआयरमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप आहेत,अशा गुन्हेगाराला भाजपा पाठिशी घालत आहे, त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा व पंतप्रधान मौन आहेत, मणिपूर जळत आहे, त्यावरही मौन आहे आणि अदानीच्या २० हजार कोटी रुपयांवरही मौन आहे, हे त्यांचे मौन देशासाठी मात्र घातक आहे. राहुल गांधी यांच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात मात्र त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले आहे. न्यायालयाकडूनही न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई लढत आहे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागू आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी तिघे एकत्र आले हे खरे आहे पण त्यात एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री तर तिसरा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणारा असे तीघेजण आहेत, या तिघांचा एकत्र मेळ बसणे अवघड दिसत आहे. एक आमदार म्हणतो मी ११० टक्के मंत्री होणार व पालकमंत्रीही होणारच आणि दुसराच मंत्री होतो आता त्याने लोकांना तोंड कसे दाखवयाचे? असा टोला थोरात यांनी मारला. या मौन सत्याग्रह आंदोलनात सहभागी नेते व कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून भाजपचा निषेध केला.