हॉस्पिटलमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांची डाॅक्टरला मारहाण
रुग्णालयाची तोडफोड, मनसेचे खळ्ळखट्याक सीसीटीव्हीत कैद
पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना घडली आहे.या तोडफोडीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. रुग्णाला पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेसैनिकांनी राडा घातला आहे.
रुग्णावर उपचार करण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली आहे. मनसेचे पालघरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे दवाखान्यात जात तोडफोड केली. यावेळी डाॅक्टर स्वप्निल शिंदे यांनाही मारहाण करण्यात आली आहे.कोरोना काळातील पेंडिंग असलेल बिल मागितल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप डाॅक्टर शिंदे यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीत डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान याच प्रकरणात मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी मागील दोन दिवसांपूर्वी देखील या हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली होती असाही आरोप करण्यात आला आहे. सध्या मनसेच्या या खळ्ळ खट्याकची चर्चा सुरु आहे.
मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅक्टरही या प्रकरणी आक्रमक झाले असून पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास रुग्णालयं बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाईल असा इशारा डॉक्टरांच्या संघटनांकडून देण्यात आला आहे.