मुंबई दि ३१ (प्रतिनिधी) – बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेला दसरा मेळावा आणि शिवसेना हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. पण या वादात आता मनसेही उडी घेतली आहे. गुडी पाडवा मेळावा घेणारी मनसे अचानक दसरा मेळाव्याच्या संघर्षात उतरल्याने पुन्हा एकदा राजकीय राळ उडणार आहे.

राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळं त्यांनीच दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात की, ‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’, असे ट्विट करून देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ही भूमिका घेतल्याने याचाही वेगळा अर्थ काढला जात आहे. महापालिकेने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी न दिल्याने मेळावा कोण घेणार याबाबत उत्सुकता असणार आहे.
शिवसेना दसरा मेळावा घेण्यावर ठाम असुन, उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणारच अशी भूमिका घेतली आहे. तर शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यावरून दोन गट आहेत. त्यामुळे शिंदेंची भुमिका अद्याप स्पष्ट नाही. तर आता मनसेही या वादात उतरल्याने मैदान एक नेते एक यामुळे आरोप प्रत्यारोपचेच सीमोल्लंघन होण्याची चिन्ह आहेत.