राज्यातील महापालिका निवडणुका या महिन्यात होणार?
चंद्रकांत पाटील यांनी सांगितला महिना, म्हणाले या महिन्यात होणार निवडणुका
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत.अशातच राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकी संदर्भात मोठं विधान केले आहे.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एवढेच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे.माध्यमांशी बोलत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भातले मॅटर सध्या हे कोर्टामध्ये आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वांना कोर्ट काय निर्णय देते याची उत्सुकता लागलेली आहे. कोर्ट काय निर्णय देत… कोर्टात नेमका काय निर्णय होतो ते बघू. पण मला असं वाटतं की, स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका ह्या ऑक्टोबर महिन्यात होतील असे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पण यावेळी पाटील यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कोर्टात स्थानिक संस्थानच्या निवडणुकी संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. मात्र, अद्याप या निवडणुकी संदर्भात कोणताही पक्का निर्णय अजुनपर्यंत झालेला नाही.
कोर्टान ठाकरे सरकारची वॉर्ड रचना मान्य केली तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारची वार्ड रचनेला मान्यता दिली तर स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांसाठी निवडणुका आयोगाला तयारी करायला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे आता निवडणुका कधी होणार हेच पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.