Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार बाळू धानोरकरांच्या निधनावर नाना पटोलेंकडून दु:ख व्यक्त

खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने समर्पित नेता, बंधुतुल्य सहकारी गमावल्याची भावना

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे तडफदार लढवय्ये नेते, चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे. हॉस्पिटलमधील उपचारानंतर ते पुन्हा बरे होऊन येतील असे वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा एक समर्पित नेता व आपण बंधुतुल्य सहकारी गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळू धानोरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता अशी धानोरकर यांची ओळख होती. जनतेच्या प्रश्नावर जागरूक राहून ते सोडविण्यासाठी ते कटिबद्ध होते, त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायला ही ते तयार असायचे. ४८ वर्षांच्या अल्पवयातच त्यांनी सामाजिक कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा खासदार असा वाखाणण्यासारखा प्रवास केला. कुठलाही राजकीय वारसा नसताना प्रचंड मेहनत आणि जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर एक कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. दोन दिवसाआधी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते आणि आज बाळू धानोरकर आपल्यातून निघून गेले. धानोरकर कुटुंबावर हा दुहेरी आघात असून आमदार प्रतिभाताई धानोरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

खा. बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठिण प्रसंगी संपूर्ण काँग्रेस पक्ष धानोरकर कुटुंबियांच्या सोबत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!