नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून मिळणार ‘नारळ’?
हा निकष ठरणार अडचणीचा, केंद्रिय मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष राहिले असताना मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.पण विद्यमान मंत्रिमंडळातील किमान ११ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील नारायण राणे यांचा देखील समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांनी सक्रिय राजकारणातून दुर होण्याचे निर्देश दिले होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ज्या मंत्र्यांचं वय जास्त आहे त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात १० मंत्र्यांचं वय ७० पेक्षा अधिक आहे. यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश, राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, रस्ते वाहतूक आणि नागरिक उड्डयन मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल वीके सिंह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह,केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस,परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह, गिरीराज सिंह, श्रीपद येस्सो नायक, आर. के. सिंह यांचा समावेश आहे तर महाराष्ट्रातील नारायण राणे यांची देखील वयाची ७० वर्ष पूर्ण केली आहेत. १० एप्रिल १९५२ ला नारायण राणेंचा जन्म झाला असून येत्या १० एप्रिलला ते वयाची ७१ वर्ष पूर्ण करतील. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची धुरा आहे. त्यामुळे यातील कोणाचा पत्ता कट होणार हे मंत्रिमंडळ विस्तारावेळी स्पष्ट होणार आहे. महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी देखील वयाची सत्तरी पार केली आहे ते ७३ वर्षाचे आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासोबत दोन राज्यपाल पदांचीही मागणी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने केली होती. अमित शाह यांनी यापैकी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती आहे.त्यामुळे शिंदे गटाचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.