राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला १० वर्षाची शिक्षा
हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी, राष्ट्रवादीला मोठा धक्का
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीत भर पडणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडीची पीडा लागलेली असतानाच आता आमदारानंतर खासदारांच्या मागे देखील चाैकशीचा ससेमिरा लागला आहे. पण आता एका खासदाराविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.
लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २००९ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.या प्रकरणात एकूण २३ आरोपी होते, त्यापैकी ४ आरोपींना शिक्षा झाली. फैजल यांच्यावर त्यांचे नातेवाईक मोहम्मद सलीह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, “फैजल यांनी लोकांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते ज्यांनी सलीह यांच्यावर हल्ला केला होता. एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर सलीह हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर अनेक महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मोहम्मद सलीह हे लक्षद्वीपचे दिवंगत माजी लोकसभा खासदार आणि पीएम सईद यांचे जावई आहेत. दरम्यान या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात अपील करून आव्हान देणार असल्याचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले आहे. खासदार फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्विपचे खासदार मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात.फैजल हे २०१४ मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते.ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. सध्या ते कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत.