Latest Marathi News

तरुणाई म्हणतेय अरे कुठे नेऊन ठेवलाय रोजगार माझा…

पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज

पुणे दि १३(प्रतिनिधी)- आपल्या देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. मध्यंतरी बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. साधारण शिक्षण असलेल्या तरुणांसोबतच हजारो उच्चशिक्षित तरुणदेखील नोकरीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. याचेच चित्र राज्यातील पोलीस भरतीत दिसत आहे. या भरतीसाठी उच्च शिक्षित तरूणांनी देखील अर्ज केले आहेत.

पुणे पोलीस दलाने कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी तीन हजार २३८ जण उच्चशिक्षित असल्याचं समोर आलं आहे. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेद पदवीधारकांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट, लॉ, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन आणि सायन्स या विषयांतील पदवीधरांचा समावेश आहे. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. आत्तापर्यंत कॉन्स्टेबलच्या ७२० आणि ड्रायव्हरच्या ७२ पदांसाठी तब्बल ७३ हजार २४२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.पुणे पोलीस दलात ड्रायव्हरची भरती प्रक्रिया 3 जानेवारीपासून सुरू झाली असून कॉन्स्टेबलची भरती 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सरकारी नोकरीची क्रेझ, खाकीचा रूबाब, आणि इतर ठिकाणी संधी नसल्यामुळे अनेकांनी पोलीस दलातील नोकरीसाठी अर्ज केले आहेत. महत्वाचे म्हणजे मागील आठ वर्षातील सरकारी नोकरी मिळण्याचे प्रमाण अर्जांच्या तुलनेत ०.०७ टक्के ते ०.८० टक्के आहे.

दरम्यान सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगारांची सुरु असलेली धडपड गेल्या आठ वर्षांमध्येही बघायला मिळाली असली तरी अवघ्या एक टक्क्यांपेक्षा कमी अर्जदारांची स्वप्नपूर्ती झाल्याचं समोर आले आहे. २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत २२.०५ कोटी अर्ज सरकारी नोकरीसाठी प्राप्त झाले, परंतु त्यातल्या अवघ्या ७.२२ लाख किंवा ०.३३ टक्के अर्जदारांना केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!