आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार?
पुण्यात राष्ट्रवादीची जोरदार बॅनरबाजी,सोशल मीडियावर चर्चा, पण कायदा काय सांगतो?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा रंगली होती पण कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार नाही?
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मार्च २०२३ रोजी आमदार बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली होती. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्याशी दमदाटी केल्याप्रकरणात ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे. सत्र न्यायालयात खटला चालल्यानंतर बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. पण एकाच गुन्ह्यांत दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा झाली आहे. या दोन्ही शिक्षा मिळून दोन वर्षे शिक्षा झाली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्रच भोगायच्या असल्यामुळे कडू यांना एकच वर्षाची कैद होणार आहे. वास्तविक लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सलग दोन वर्षांची शिक्षा झाली तरच त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. परंतू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणामंध्ये ही दोन वर्षांची शिक्षा झाली आहे, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व आमदारकी रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे कडू यांचे आमदार पद कायम राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची पुण्यातील बॅनरबाजी निरर्थक ठरली आहे.
राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी देत सरकारला घरचा आहेर दिला आहे.