
एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रमुख स्त्रोत आहे. एसटी ही ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. ग्रामीण भागाला तालुके आणि जिल्ह्यासोबत जोडण्याचं प्रमुख काम एसटी करते.

ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, मजूर याच एसटीने नियमित प्रवास करतात. एसटी ही त्यांचे प्रवासाचे प्राथमिक साधन आहे. एसटी थांबली तर लाखो नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे एसटीसोबत ग्रामीण भागातील नागरिकांचा एक वेगळा जिव्हाळा आहे. प्रत्येक प्रवाशाचं एसटीसोबत भावनिक नातं आहे.

असं असलं तरी अनेक बस स्थानकांवर अस्वच्छता सर्रासपणे बघायला मिळते. तिथल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था प्रचंड वाईट असते. याशिवाय बस स्थानकावर देखील अस्वच्छता पसरलेली बघायला मिळते. अशाच एका बस स्थानकावरील अस्वच्छतेचा प्रत्यय स्वत: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आला आहे. त्यांनी यामुळे संताप व्यक्त केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गुरुवारी (30 एप्रिल) इंदापूरच्या दौऱ्यावर होते. प्रताप सरनाईक हे डॅशिंग मंत्री आहेत. ते नेहमी वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या एसटी स्थानकांना भेट देत असतात. एसटीचं कामकाज ठिक चालू आहे ना, तिथल्या प्रवाशांना कोणता त्रास होतोय, याची पडताळणी करत असतात.
अशीच भेट त्यांनी इंदापूर स्थानकात दिली. यावेळी इंदापूर बस स्थानकातील अस्वच्छतेवर पहिरवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी अस्वच्छतेवरुन आगार व्यवस्थापकांना चांगलंच फैलावर घेतलं. बस स्थानकांची तात्काळ स्वच्छता करण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले.

