पुणेरी जगात भारी! चक्क कुत्र्याला घातले हेल्मेट
कुत्र्याला हेल्मेट घातल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांनी लढवली अनोखी शक्कल
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो पुण्यातील आहे. या व्हिडिओत आम्ही पुणेकर जगात भारी म्हणत चक्क एका कुत्र्याला हेल्मेट घालण्यात आले होते.
पुणेकरांनी हेल्मेट घालावे यासाठी कुत्र्याला हेल्मेट घालून अगदी अनोख्या पद्धतीने जनजागृती केलीय. वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी दुचाकीस्वारांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे, यासाठी पाळीव कुत्र्याला हेल्मेट घालून जनजागृती सुरू केली आहे. त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पोलिसांनी श्वानाला आपल्या गाडीवर समोर बसवून हेल्मेट परिधान करुन दिले आणि जनजागृती केली आहे. अनोख्या आयडियाचा वापरत करत वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी वाहनचालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पुणे वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई देखील केली जात आहे.

पुण्यातील रस्त्यावर दुचाकीस्वारांची संख्या लाखोंच्या वर गेली आहे. त्याचबरोबर शहरात दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातात देखील वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघातात बहुतांश जणांच्या मेंदूला गंभीर इजा होते. त्यामुळे हेल्मेट घालणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीसांनी अनोखी शक्कल वापरत जनजागृती केली आहे.