शिंदे फडणवीस सरकार बजेट सादर करण्यापूर्वी अडचणीत
बजेटकडुन जनतेला अपेक्षा, फडणवीस शेतक-यांना मोठी भेट देणार?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. पण मंत्रिमंडळ रचनेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार कोंडीत सापडले आहे.
राज्यातील सध्याच्या मंत्रिमंडळाच्या रचनेमुळे हा पेच निर्माण झाला आहे. विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्र्याकडून अर्थसंकल्प मांडला जातो. परंतु, सध्या राज्यात अर्थ राज्यमंत्री पदावर कोणीच नाही. त्यामुळे विधान परिषदेत कोण अर्थ संकल्प सादर करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी दीपक केसरकर किंवा शंभूराज देसाई यापैकी एकजण बजेट सादर करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूका असल्यामुळे यंदाचा बजेट फारच महत्वाचा आहे. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार सुद्धा तशी योजना सुरु करण्याची शक्यता आहे. पण तुट वाढल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात काय असणार आणि काय नाही हे पहावे लागणार आहे.
अर्थशास्त्राची पदवी घेतलेले फडणवीस अर्थमंत्री म्हणून आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.कालच विधानसभेत राज्य सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला होता. यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ९.१ टक्के इतका असल्याचे नमदू करण्यात आले होते.