शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?
सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची राजभवनात नोंदच नाही, माहिती अधिकारात उघड
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे. त्यामुळे राज्यात कार्यरत असलेले सरकार संविधानिक दृष्ट्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी मागितलेल्या माहितीवर ही माहिती देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची छायांकित प्रत मिळावी, असे अपील जाधव यांनी केले हाेते. त्यावर हिवाळी अधिवेशनामुळे सुनावणी घेण्यात आली नव्हती. अधिवेशन संपल्यानंतर ही सुनावणी राज्यपालांच्या सचिवालयात ४ जानेवारीला घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने दिले आहे. राजभवनाच्या या उत्तरानंतर विधीमंडळ सचिवालयाने कोणत्या अधिकारात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी घेतला, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान यापूर्वी जाधव यांनी ८ ऑक्टोबर २०२२ला मागविलेल्या माहितीवर सत्तास्थापनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दिलेल्या पत्राची पत्र राजभवनाने दिली होती. आता हा मुद्दा विरोधक लावून धरण्याची शक्यता असल्यामुळे सरकार आणि राज्यपाल अडचणीत येण्याची शक्यता आहे.