अजित पवारांमुळे शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर?
शिंदे गटातील आमदारांचा एकनाथ शिंदेना इशारा देत केली ही मागणी, भाजपातील खदखदही समोर
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पडद्यासमोर आणि पडद्यामागे जोरात राजकारण सुरु आहे. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे आणि गटाची कोंडी झाली आहे. आता तर एकनाथ शिंदे गटातच दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे.
अजित पवार रविवारी सरकारमध्ये सामील झाले. पण फक्त सामीलच झाले नाहीतर आपल्यासह नऊ जणांचा शपथविधी करत मंत्रीपद देखील नक्की केले. दुसरीकडे शिंदे गट दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अजूनही डोळे लावून आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही अजित पवार सत्तेत सामील होणार आहेत, याची साधी कल्पनाही देण्यात आलेली नव्हती. अगोदर शिंदे गटाला किमान २० मंत्रीपदे मिळतील अशी आशा होती. पण आता केवळ १४ ते १५ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटात मंत्री असलेले आणि आमदार असे दोन गट पडले आहेत. ‘आम्ही देखील बंड केला आहे. त्यामुळे आम्ही दूर का?, आम्ही फक्त पालख्या वाहण्याचे काम करायचे का? आम्हाला कधी न्याय मिळणार? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे. तसेच मंत्री असलेल्या लोकांची मंत्रिपदे काढून घेण्याची मागणी काही आमदारांनी बैठकीत केली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संधी न मिळालेल्या अनेक आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याची आश्वासन देण्यात आले होते. पण अजित पवारांमुळे ती संधी मागे पडली आहे. आजवर शिंदे गटाची बाजू मांडणारे आमदार संजय शिरसाठ यांनी देखील पक्षात नाराजी असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिंदे गट फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला थोपवण्याचे काम एकनाथ शिंदेना करावे लागणार आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपमध्येही धुसफूस सुरु झाली आहे. राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर जुन्या, निष्ठावान सामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी फडणवीस यांना काही प्रश्न विचारत नाराजीला वाचा फोडली आहे.