मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मिळणार ‘इतकी’ मंत्रीपदे
मंत्री पदासाठी शिंदे गटात स्पर्धा, नारायण राणे यांना डच्चू मिळण्याची शक्यता
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद मिळेल अशी दाट शक्यता आहे.पण मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जात असल्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत.
मोदी सरकारच्या या फेरबदलात शिंदे गटालाही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कोणत्या दोन खासदारांना संधी मिळणार हे अद्याप जाहीर नसले तरीही यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदलापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यासाठी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक मागितले आहे. पंतप्रधान माेदी हे कामात दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांची खूर्ची काढून घेणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजताप अस्वस्थता आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख जेपी नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपत आहे. याशिवाय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही जानेवारीत होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या अगोदर हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचा निवडणुकीपुर्वीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी महत्वाचे म्हणजे नारायण राणे हे कायम राहणार की त्यांना डच्चू मिळणार हे पहावे लागणार आहे.
मोदी सरकारमधील सध्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनसुख मांडवीय, निर्मला सितारमन, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, स्मृती इराणी वगळता अन्य मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीचा विचार करुन कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.