शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार?
अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या एकनाथ शिंदेना धक्का?, सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला एक वर्ष झाले आहे. मध्यंतरी अनेक घडामोडी घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून निसटले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाले. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना ठाकरे गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता. आता निवडणूक येऊ शकतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तातडीने सुनावणी करावी असे ठाकरे गटाने म्हटले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिलेले आहे. शिंदे यांचे पक्ष संघटनेतील बहुमत विधिमंडळातील बहुमत पाहून निवडणूक आयोगाने आपला अधिकार वापरून पक्ष संघटना आणि पक्ष चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथशिंदे गटाचे होते असा युक्तिवाद निवडणूक आयोगाने केला होता. पण अपात्र आमदारांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या बंडखोरांचे विधीमंडळातील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत “शिवसेना” म्हणून मान्यता दिली होती, त्यांना अधिकृत “धनुष्य आणि बाण” चिन्ह आणि “शिवसेना” नाव वापरण्याची परवानगी दिली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” हे नाव आणि “ज्वलंत मशाल” हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.