
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे असे गोळीबारात जखमी झालेल्या पतीचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा गोळीबार स्वतः केला की यामागे दुसरं काही कारण आहे, यावरून फरासखाना पोलिसांनी संशय व्यक्त करत सखोल तपास सुरू केला आहे.

भांडणात एकमेकांना दिले ‘गोळी मारण्याचे’ आव्हान

सततचा कौटुंबिक वाद: अभिजीत शिंगोटे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी वाद विकोपाला गेला. बाचाबाची दरम्यान दोघांनी एकमेकांना गोळी मारण्याचे आव्हान दिले. याच वादात अचानक गोळीबार झाला आणि एक गोळी अभिजीत यांच्या उजव्या खांद्याला लागली. गोळी लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिजीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

फरासखाना पोलिसांना घटनेवर संशय
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे जप्त केले आहेत. पतीने स्वतःवर गोळी झाडली की पत्नीकडून गोळी झाडली गेली, याबाबत पोलिसांच्या मनात शंका आहे. या प्रकरणाचे खरे सत्य शोधण्यासाठी पोलीस पत्नीसह परिसरातील नागरिकांची चौकशी करत आहेत.

