पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे काजूकतली फुकट दिली नाही म्हणून एका स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली. घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांना हा प्रकार पोलीसांना सांगितला त्यानंतर तपासणी केली असता ती बंदूक खरी असल्याचे समोर आले.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत.