वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडे मागितली लाच
लाच घेतानाचा प्रकार कॅमे-यात कैद, लाचखोर पोलिसावर कारवाई
ठाणे दि २१(प्रतिनिधी)- कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्ती मेळावणे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाच घेतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. यानंतर पोलिस विभागाने कारवाई केली आहे.
चक्कीनाका भागात एका रिक्षा चालकाकडून वाहतुकीच्या नियमाचा भंग झाला. यावेळी चक्कीनाका भागात कर्तव्यावर असलेले वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मेळावणे यांनी चालकाला थांबवत दंडात्मक कारवाईचा करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मेळावणे यांनी रिक्षा चालकाला वाहतूक पोलीस चौकीत नेले आणि त्याच्याकडे ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केली. रिक्षाचालकाने १०० रु घेण्याची विनंती केली. अखेर नाही होय करत शेवटी त्यांनी दोनशे रूपयाची मागणी केली. नेमका यावेळी २०० रुपयांची रक्कम मेळावणे चालकाकडून स्वीकारत असल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.रिक्षा चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला लाचखोरीचा प्रकार सोशल मिडीयावर. व्हायरल केल्याने हा प्रकार समोर आला. यामुळे खळबळ उडाली आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहतूक विभागाने निवृत्ती मेळावणेची तात्काळ कोळसेवाडी वाहतूक शाखेतून वाहतूक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मेळावणे यांची विभागीय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेळावणे निवृत्त होण्यास फक्त सहा महिने बाकी आहेत.