….म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
राजीनाम्यावर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे म्हणाले गद्दारांनी...
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अखेर सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यात न्यायालयानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर ते सरकार परत आणलं असतं असं महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवलं. पण आता उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या निकालावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव ठाकरेंनी ‘मातोश्री’वर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. उध्दव ठाकरे म्हणाले,हापापलेल्या लोकांनी माझ्याविरोधात अविश्वास आणावा आणि मी त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्ताव सामोरं जावं हे मला मंजूर नव्हतंच..मंजूर नाहीच.. मी कदापि ते मान्य करणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. तसं सर्वोच्च न्यायालयाने एवढे फटके दिल्यानंतर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्याच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं असं म्हणत आपण ती चूक का केली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला हे चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण मी माझ्यासाठी ही लढत नाही. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपाल यंत्रणेचे धिंडवडे, शासनकर्ते ज्यापद्धतीने काढत आहेत. ते बघितल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हाच मोठा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे नेला पाहिजे असेही मत ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. तसेच निवडणूक आयोग ब्रम्हदेव नाही मतांच्या टक्केवारीवर असं कोणाला नाव, पक्ष चिन्हं देखील देणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहे. आपल्याकडून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह काढलं जाऊ शकत अशी भूमिका देखील ठाकरेंनी मांडली आहे.